छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या मतदार यादीची तपासणी पूर्ण झाली असून, त्यातून १३ हजार दुबार मतदार निश्चित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुबार मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार असून, मतदान केंद्रावर त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊनच मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मनपा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्राथमिक मतदार यादीमध्ये सुमारे ५८ हजार दुबार मतदारांची नोंद होती. या यादीवर महापालिका प्रशासन, निवडणूक विभाग आणि संबंधित अधिकार्यांनी संयुक्तपणे छाननी केली. नाव, पत्ता, वय, ओळखपत्र क्रमांक आदी बाबींची पडताळणी केल्यानंतर प्रत्यक्षात १३ हजार मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित नोंदी तांत्रिक कारणांमुळे किंवा दुरुस्तीअभावी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुबार मतदारांच्या नावासमोर मतदार यादीत दोन स्टार चिन्ह लावण्यात आले आहे.
अशा मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्याकडून विशेष संमतीपत्र भरून घेतले जाणार आहे. यात मी केवळ एकदाच मतदान करणार असून, दुबार मतदान करणार नाही, अशी हमी देणारे हे संमतीपत्र घेतल्यानंतरच संबंधित मतदाराला मतदानाची परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










